कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. तर बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, त्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
कोकणात बारसू प्रकल्प नको, अशी येथील जनतेची मागणी आहे. राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांनी तीन दिवस आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी धरपकड करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ताब्यात घेतले होते. तर काही आंदोलक नेत्यांना अटक केली होती. त्यामुळे या आंदोलनात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. लोकांशी चर्चा करा. त्यांना समजून सांगा. केवळ लाठ्याकाट्याच्या जोरावर आणि पोलिसी बळावर हा प्रकल्प लादू नये, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे.
