बारसू रिफायनरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी
बारसू रिफायनरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावरही या प्रकल्पाबाबत कुठलंही वक्तव्य करु नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आलीय. यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्तीस्वातंत्र्यावरच गदा आणत असल्याची टिप्पणी केली आहे. बारसू आंदोलकांसोबत असल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी तातडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान, अशा नोटीशींना आपण भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.
म्हणून पोलिसांनी राजू शेट्टी यांना नोटीस बजावली
राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विविध ठिकाणी आंदोलन करुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडविल्याचे कारण दाखवित रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये 31 मेपर्यंत राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली आहे. यामध्ये सोशल मीडियावरही पोस्ट, पोटो अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरीला येणार आहेत. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली असताना आपण बारसूला जाणार आहेच, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. अशा नोटीशींना आपण मी भीक घालत नसून ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात करताच पोलीस ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळे शेट्टी गनिमी गावा करणार असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसूला जाणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 मे रोजी बारसूत जाणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वज्रमूठ सभेतून घोषणा केली. त्यामुळे उद्धव ठाकरे लोकांशी चर्चा केल्यानंतर काय भूमिका घेतात, याची उत्सुकता लागली आहे. कारण त्याच दिवशी महाड येथे ठाकरे यांनी सभा होत आहे. या सभेत ते मोठी घोषणा करु शकतात. त्याचवेळी दुसरीकडे बारसू येथील आंदोलन पेटले असल्याने रत्नागिरीत येण्यास मुंबईकरांना बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बारसू रिफायनरी सर्व्हेक्षणाला महिलांनी तीव्र विराेध दर्शविला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाला विराेध करणाऱ्या आंदोलकांवर पाेलिसांनी बळाचा वापर केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पाेलीस आणि आंदाेलकांमध्ये हमरीतुमरी हाेत असताना दिसून आले. त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले आहे. दरम्यान, हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आमचा खून झाला तरी चालेल, मेलाे तरी चालेल आम्ही लढणार मागे हटणार नाही अशी भूमिका बारसू प्रकल्पाला विराेध करणाऱ्या ग्रामस्थांनी घेतली आहे.