अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Parliament Budget Session) दुसऱ्या टप्पा आजपासून (13 मार्च) सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याआधी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी कॅबिनेट मंत्र्यांसोबत (Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक घेतली. संसदीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा टप्पा आज सोमवारपासून सुरु होत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या टप्पा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज 13 मार्च रोजी संसदेत जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. राज्यात निर्वाचित सरकार नसल्यामुळे जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याचं हे चौथे वर्ष असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-2024 चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील आणि त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. 31 मार्चपर्यंत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणं आवश्यक आहे. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल.
6 एप्रिलपर्यंत चालणार अधिवेशन
आज 13 मार्चपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत असेल.
