“पुढच्या 30 मिनिटात….”, Zoom च्या सीईओंनी एकाचवेळी 1300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं
अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु असताना कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (Communication Technology) कंपनी Zoom चाही यात समावेश झाला आहे. Zoom ने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली असून 1300 जणांना कामावरुन काढून टाकलं आहे. Zoom ने एकूण 15 टक्के कर्मचारी कपात केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी एरिक युआन (chief executive Eric Yuan) यांनी मंगळवारी कंपनीच्या अधिकृत ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.
नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख मेहनती आणि हुशार असा करताना एरिक युआन यांनी सांगितलं आहे की, जे कर्मचारी अमेरिकेत आहेत त्यांना ई-मेल पाठवला जाईल. तसंच जे अमेरिकेच्या बाहेर आहेत त्यांना गरजेनुसार कळवण्यात येणार आहे.
“तुम्ही अमेरिकेत स्थायिक कर्मचारी असाल ज्यांना फटका बसला आहे, त्यांना पुढील 30 मिनिटांत तुमच्या झूम आणि वैयक्तिक इनबॉक्सवर ईमेल प्राप्त होईल. या ई-मेलमध्ये Departing Zoom: What You Need to Know असं लिहिलेलं असेल. इतर ठिकाणच्या कर्मचार्यांना स्थानिक गरजेनुसार कळवण्यात येईल,” असं एरिक युआन म्हणाले आहेत.
नोकरीवरुन काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 16 आठवड्यांचा पगार, हेल्थकेअर कव्हरेज, कंपनीच्या कामगिरीवर आधारित कमावलेल्या आर्थिक 2023 वार्षिक बोनसची रक्कम, आरएसयू (restricted stock units) देण्यात येणार आहे. अमेरिकेतील कर्मचार्यांसाठी सहा महिन्यांसाठी स्टॉक ऑप्शन वेस्टिंग आणि 9 ऑगस्ट 2023 पर्यंत अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
करोना काळात कर्मचारी घरुन काम करत असल्याने कम्युनिकेशन सॉफ्टवेअरला प्रचंड मागणी होती. यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आली होती. पण करोनाची लाट ओसरल्यानंतर तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे.