Satara Crime News : भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; साफसफाई करताना समोर आला सर्व प्रकार
साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यात भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ( body found in ormer BJP MLA bungalow) आढळला आहे. माजी आमदाराच्या बंगल्यामागे हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे (Kantatai Nalawade) यांच्या बंगल्यामागे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांचा साताऱ्यातील वाडे गावात एक जुना बंगला आहे. हा बंगला बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. मात्र शुक्रवारी दुपारच्या सुमारात बंगल्याच्या मागे सफाई करताना एक मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह चिखलात टाकून देण्यात आला होता. कुजलेल्या स्थितीतील मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला.
हा सर्व प्रकार समजताच गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तपास सुरु ठेवला होता.
कोण आहेत कांताताई नलावडे?
भाजपच्या विधान परिषदेच्या माजी आमदार असलेल्या कांताताई नलावडे या वाढे सातारा येथील आहेत. भाजपमध्ये कांताताई यांनी मोठ्याप्रमाणात संघटनात्मक काम केले आहे. कांताताई नलावडे या अखिल भारतीय पातळीवर महिला संघटनेच्या प्रमुख होत्या. याच पार्श्वभूमीवर कांताताई यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले होते. राजकारणासोबत साहित्य क्षेत्रातही कांताताई नलावडे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. नुकत्याच त्यांच्या ‘भरारी’ या कविता संग्रहाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ लेखक डॉ. शिरीष देशपांडे यांच्या हस्ते पार पडले होते.
पतीचे नुकतेच निधन
माजी आमदार कांताताई नलावडे यांचे पती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक जयसिंग नलावडे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. जयसिंग नलावडे हे संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. ते शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले होते.