देश

Tanmay Borewell: 86 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपयश, बोरवेलमधील 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मध्यप्रदेशातील (Mahdya Pradesh) बोरवेअलमध्ये पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बेतूल (Betul) जिल्ह्यात एका 55 फूट खोल बोरवेअलमध्ये 6 डिसेंबर रोजी तन्मय साहू (Tanmay Sahu) हा मुलगा पडला होता. त्याची सुटका करण्यासाठी 86 तासांचे अथक प्रयत्न करण्यात आले. आज सकाळी 6 वाजता त्याला बाहेर काढण्यात आलं. तातडीनं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

बैतुलमध्ये 6 डिसेंबर रोजी तन्मय साहू नावाचा 8 वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. 55 फूट खोलीवर असलेल्या बोअरवेलमध्ये तन्मय अडकला होता. तन्मयला वाचवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास तन्मयला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तन्मयचा जीव वाचू शकला नाही. बैतुलच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. तन्मय जीवनाची लढाई हरला. बचावकार्य यशस्वी झाले, मात्र जीव वाचवण्यासाठी करण्यात आलेले बचावकार्य अपयशी ठरले.

रेस्क्यू टीम बोगदा करुन तन्मयपर्यंत पोहोचली…
तन्मयला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम सतत बचावकार्य करत होती. बोअरवेलजवळ बोगदा करण्यात आला आणि त्यानंतर तन्मयला बाहेर काढण्यात आले. मात्र, तन्मयचा जीव वाचवण्यात यश आले नाही. तन्मयच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

तन्मय 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला
मंगळवारी संध्याकाळी 8 वर्षीय तन्मय खेळत असताना 55 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. तन्मयला वाचवण्यासाठी बोअरवेलच्या समांतर खोदकाम करण्यात आले. मात्र, मध्येच पाणी शिरल्याने मदतकार्यावर परिणाम झाला. नंतर बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयपर्यंत पोहोचण्यासाठी बोगदा करण्यात आला.

तन्मयचा जीव वाचू शकला नाही
विशेष म्हणजे तन्मयच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी त्याचा पुरवठाही केला जात होता. तन्मयच्या सुरक्षेसाठी सतत प्रार्थना केल्या जात होत्या, पण त्या निष्पापाला आपला जीव गमवावा लागला.

Related Articles

Back to top button