Maharashtra Police Recruitment : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट
राज्यात होणाऱ्या पोलीस शिपाई भरतीला (Maharashtra Police Recruitment) प्रशासकीय कारणामुळे स्थगिती देण्यात आल्याने इच्छूक तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मात्र आता उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. या अपडेटमुळे तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. (maharashtra home minister devendra fadnavis announced about 18 thousand police recruit in within a week)
राज्यात येत्या आठवड्यात 18 हजार पोलिसांची पदभरती करणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. मुंबईत राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात येत्या एका वर्षात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्धारही फडणवीस यांनी केलाय.
पोलीस भरतीनंतर ग्रामविकास खात्यातही महिन्याभरात 10 हजार पदांची भरती काढणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. दरम्यान या नोकरभरतीमुळे राज्यातील तरुणांना मोठा प्रमाणात रोजगार मिळणार हे नक्कीच.
नोकरभरतीची वयोमर्यादा वाढणार?
राज्यात पोलीस भरतीसह इतर शासकीय भरतीतील वयोमर्यादा वाढवण्यात येणार आहे. राज्यात कोरोनामुळे 2 वर्षे शासकीय नोकरभरती काढता आली नाही. शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना प्रवर्गनिहाय वयाची अट असते. मात्र कोरोनात तरुणांच्या वयात 2 वर्षांनी वाढ झाली. त्यामुळे काही तरुण हे आपोआप या नोकरीच्या स्पर्धेतून बाद झाले. यामुळे नोकरभरतीत वयाच्या अटीत 2 ते 3 वर्षांनी वाढ करावी, अशी तरुणांची मागणी आहे. ही मागणी सरकार वाढवणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. यामुळे वयाच्या मुद्द्याबाबत काय निर्णय होणार, याकडेही तरुणांचं लक्ष असणार आहे.