ठाकरे कुटुंबाचा विश्वासू चंपासिंग थापा यांनी सोडली ‘मातोश्री’ची साथ, शिंदे गटात सामील
राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जाणारे चंपासिंग थापा (Champasingh Thapa) ठाकरे कुटुंबाची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावेळेपासून चंपासिंग थापा ठाकरे कुटुंबात वावरत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे ते अतिशय निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातल्या देवीची आज वाजत गाजत मिरवणूक निघाली. त्या मिरवणूकीत चंपासिंग थापा सहभागी झाले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंपासिंग थापा यांचं शाल आणि फुलांचा गुच्छ देत स्वागत केलं. आपण आता यापुढे शिंदे गटाबरोबर राहणार असल्याचं थापा यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या विचारांना पाठिंबा – मुख्यमंत्री
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थापांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वांच्या विचारांना पाठिंबा दिला, समर्थन दिल्याचं सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे सावली सारखे राहिले, ते चंपासिंग थापाही शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाताय, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाताय, जी गोष्ट 2019 ला व्हायला नको होती, ती गोष्ट तुम्ही करताय, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जो कोणी पुढे नेत असले त्यांच्यासोबत हा थापा राहिल असं मुख्यमंत्री म्हणाले
कोण आहेत चंपासिंग थापा
अनेक वर्षांपूर्वी चंपासिंग थापा नेपाळहून मुंबईत आले. लहानमोठी काम करुन पोट भरणारा हा मुलगा भांडुपचा नगरसवेक के टी थापा यांच्याबरोबर ‘मातोश्री’वर (Matoshree) आले. आणि इथूनच त्यांनी स्वत:ला बाळासाहेबांना अर्पण करुन टाकलं. इमानदार आणि जीवाला जीव देणाऱ्या थापाला बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने हेरलं. तेव्हापासून थापा बाळासाहेबांची सावलीच बनले. बाळासाहेबांचा दिनक्रम सांभाळणं, त्यांची सेवा करणं हे थापाने स्वत:च व्रत मानलं. बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारा थापा हा थोडय़ाच काळात मातोश्री परिवाराचा सदस्य झाला.
चंपासिंग थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचे होते. बाळासाहेबांच्या आजारपणात थापाने त्यांची फार काळजी घेतली होती. बाळासाहेबांच्या अंत्यविधिलाही ते त्यांच्या अगदी शेजारी होते. थापाने मातोश्रीवर अनेक राजकीय घटना अगदी जवळून पाहिल्या. ते या सर्व घटनांचे प्रमुख साक्षीदार राहिले आहेत.