देश

Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, नवसाची आणि मुखदर्शनाची रांग कधी बंद होणार?

राज्यातील तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन गुरुवारी रात्रीपासून बंद होणार आहे. येत्या ९ तारखेला अनंत चतुर्दशी आहे. यादिवशी लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) विसर्जनासाठी मंडपातून बाहेर निघेल. त्याची तयारी करण्यासाठी लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने उद्या मध्यरात्रीपासून गणपतीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या सकाळी ६ वाजता चरणस्पर्शची रांग आणि उद्या रात्री १२ वाजता मुख दर्शनाची रांग बंद करण्यात येईल. त्यामुळे आता भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे असेल तर अवघे काही तास उरले आहेत. (Anant Chaturdashi Visarjan ceremony 2022)

लालबागचा राजा हा मुंबईतील प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देश आणि परदेशातून भक्तगण येतात. तसेच राजकारणी आणि सेलिब्रिटीही लालबागाचा राजाचे आवर्जून दर्शन घेतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात लालबागाच्या राजाच्या दरबारात २४ तास गर्दी असते. गेली दोन वर्षे कोरोनाची साथ असल्यामुळे राज्यात गणेशोत्सव साजरा होऊ शकला नव्हता. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने लालबागचा राजाच्या दर्शनासाठी यंदा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

भक्तांचा फुटपाथवर मुक्काम

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भक्तांनी तासनतास रांगेत उभे राहणे, ही एव्हाना नवीन बाब राहिलेली नाही. यंदाही भाविकांनी राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीपूर्वीच मंडपाबाहेर रांगा लावायला सुरुवात केली होती. त्यासाठी हे भाविक दोन दिवस आधीपासूनच फुटपाथवर मुक्काम ठोकून बसले होते. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते अमित शाह यांनीही मुंबईत येऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. अमित शाह आपल्या कुटुंबासह लालबागच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेतेही उपस्थित होते.

Related Articles

Back to top button