शिवसेनेतून विजय शिवतारे यांची हकालपट्टी, पक्षाचे सदस्यत्वही रद्द
शिवसेनेतून नेते, पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचं सत्र सुरु आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केलेत.
विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. त्याचवेळी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारेंच्या हकालपट्टीनंतर पुरंदरमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.
शिवसेनेला मोठा धक्का
दरम्यान, रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. अशातच शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. काही नगरसेवकांनी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतलीय. त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेतील २३ पैकी २० नगससेवक उदय सामंत यांच्यासोबत आहेत, असा दावा सामंत समर्थकांकडून केला जातोय. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.