indiaदेश

FASTag संदर्भातील तो Video आणि दावा खोटा; सरकारचे स्पष्टीकरण

या व्हिडीओमध्ये सांगितलंय की मुलाने कार साफ करण्याच्या बहाण्याने फास्टॅगमधील पैसे काढून घेतले.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये कारची काच कापडाने साफ करताना एक मुलगा स्मार्ट वॉचच्या मदतीने फास्टॅगचा स्कॅन कोड स्कॅन करत असल्याचे दिसून येते. त्यानंतर मुलगा तेथून पळून जातो. व्हिडीओच्या शेवटी, कार चालक सांगतो की मुलाने कार साफ करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली. फास्टॅगमध्ये जमा केलेले पैसे त्याने आपल्या स्मार्ट वॉचने स्कॅन करून काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

कारची खिडकी साफ करताना एक मुलगा आपल्या स्मार्ट वॉचने फास्टॅग स्कॅन करतो आणि नंतर तेथून पळून जातो, असे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. यानंतर कारचालक हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचे सांगतात. त्याचप्रमाणे स्मार्ट वॉचने स्कॅन करून फास्टॅग अकाउंटमधून पैसे चोरले जातात आणि लोकांना त्याची माहितीही नसते. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांनीही तो खरा मानला आणि व्हिडीओला रिट्विट आणि शेअर करण्यास सुरुवात केली.

पण आता या व्हिडीओची सत्यता समोर आली आहे. सरकारकडून यासंबंधीचे सातत्य पडताळणीचे ट्विट करण्यात आले असून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

काय आहे या व्हिडीओमागील सत्यता ?
पीआयबीने या संबंधी एक ट्विट करून या व्हिडीओची सत्यता सर्वांसमोर आणली आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की वाहनांवर फास्टॅग स्वाइप करण्यासाठी स्मार्टवॉचसारख्या उपकरणांचा वापर केला जात आहे, ज्यामुळे प्रीपेड वॉलेटमधून फसवणूक करून पैसे कापले जात आहेत. परंतु हा व्हिडीओ खोटा आहे. असे व्यवहार शक्य नाहीत. प्रत्येक टोल प्लाझाला एक युनिक कोड असतो.’

वास्तविक, अशी चोरी शक्य नाही. फास्टॅगच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओला प्रतिसाद म्हणून, एक पोस्ट केली गेली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की फास्टॅगवर कोणतेही अनधिकृत डिव्हाइस व्यवहार करू शकत नाही. केवळ नोंदणीकृत व्यापारी (टोल आणि पार्किंग प्लाझा ऑपरेटर) ते करू शकतात. त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
याशिवाय पेटीएमनेही ट्विटरवर एक पोस्ट केली असून व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. पेटीएम फास्टॅग पूर्णपणे सुरक्षित आहे. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. यावरून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून करण्यात येत असलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Back to top button