बंगालच्या हावडामध्ये पुन्हा हिंसाचार, दंगलीमागे भाजपाचाच हात; ममता बॅनर्जींचा आरोप
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात निदर्शने होत आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात आज पुन्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ७० जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाने हावडा जिल्ह्यात १३ जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे. त्याचबरोबर हावडामधील अनेक भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरले आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की, “हावडामध्ये हिंसक घटना घडत आहेत, त्यामागे काही राजकीय पक्ष आहेत आणि त्यांना दंगल घडवायची आहे, परंतु हे सहन केले जाणार नाही. या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. हावडा जिल्ह्यातील डोमजूर पोलीस ठाण्याची आज तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी अनेक दुकाने फोडली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.