इंडिया गेटवरील १९७१ च्या युद्धातील हुतात्मा जवानांचे स्मारक आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलविण्यात आले आहे. या अगोदर शहीद स्मारकावरील अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकात करण्यात आले होते. लष्करी इतमामात हुतात्मा सैनिकांचे स्मृती चिन्ह इंडिया गेट परिसरात असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील परम योद्धा स्थळ या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
या वर्षी जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर अमर जवान ज्योत इंडिया गेटवरून राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलवण्यात आली होती. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर, बांगलादेशच्या मुक्ततेनंतर तसेच स्मारकाची स्थापना झाल्यापासून ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच इंडिया गेटच्या खाली चिरंतन तेवत राहणारी ज्योत विझवण्यात आली.
यावेळी तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रथम इंडिया गेटवरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रायफल आणि हेल्मेट विशेष वाहनाने परम योद्धा स्थळ ठिकाणी नेण्यात आले. १९७१ च्या युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या वीर जवानांच्या सर्व स्मृती राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये एकाच ठिकाणी ठेण्यात आल्या आहेत. या आगोदर जेव्हा इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील ज्योतीमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते, तेव्हा कॉंग्रेसने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केंद्र सरकारवर टीका केली होती.
