दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील शहर मजार-ए-शरीफजवळ बसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करण्यात आलं. मृतांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं प्रांतीय आरोग्य अधिकार्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मजार-ए-शरीफमध्येच, 21 एप्रिल (गुरुवार) दुपारच्या नमाजच्या वेळी सेह डोकान मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 58 लोक जखमी झाले होते. दहशतवादी संघटना इसिसने (ISIS) या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. शिया मशिदीवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखणाऱ्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याला तालिबानी सैन्याने अटक केली.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 21 एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. शियाबहुल भागाजवळ हा स्फोट झाला. याच्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करून अनेक स्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे सहा मुलांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले. अब्दुल रहीम शहीद हायस्कूलमध्ये आणि काबूलजवळील शियाबहुल भागातील दश्त-ए-बरची येथील मुमताज एज्युकेशन सेंटरजवळ हे बॉम्बस्फोट झाले. 22 एप्रिल रोजी कुंदुझच्या उत्तरेकडील प्रांतातील एका मशिदीत स्फोट होऊन यात 33 लोक मारले गेले.
तालिबानच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित
तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता हाती दावा करण्यात येत आहे की, त्यांनी देश सुरक्षित केला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय संस्था आणि विश्लेषक तालिबानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद पुन्हा डोकं वर काढण्याचा धोका आहे. इस्लामिक स्टेट या अतिरेकी गटाने अनेक मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे.