भाजपाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे : चंद्रकांत पाटील
‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी पुण्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत अन्य नेतेही उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपा ही काही १९५१ साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचं हिंदुत्वाचा संदर्भ देत म्हटलं आहे. यावेळी पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
“भाजपाबद्दल किती अज्ञान असावं. या पक्षाला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. हा विषय अज्ञानाचा असू शकतो. पण हा पक्ष ८० साली स्थापन झाला असे समजणारे खूप महाभाग आहेत ज्यांना टीव्हीवर रोज कव्हरेज मिळते. अशा लोकांना पक्ष ८० साली स्थापन झाला. ८० ला पक्ष स्थापन झाल्यानंतर त्याला आम्ही गावोगावी नेलं असं काहींना वाटतं. १९८८ ला त्यांचा पहिला आमदार झाला. त्या आमदाराची पार्श्वभूमी इथे मांडणं बरोबर नाहीय. मी त्या भागातला जिथं पहिला आमदार झाला,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला. यापूर्वी अनेकदा राऊत यांनी शिवसेनेसोबत असल्याने भाजपा महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पोहचल्याचं वक्तव्य केलं आहे.