देश

महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न

जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून अवैध वाळू वाहतूकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराला वाळू माफियांकडून जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वेळीच तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने स्वतःच बचाव करून तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.

राहुल गायकवाड ( वय ४६, रा. केपी मार्केट वैजापूर ) असे या तहसीलदारांचे नाव आहे. तर याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

तहसीलदार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ते १० मार्च रोजी रात्री आपल्या पथकासह गस्तीवर असताना लाखणी शिवारातील शिवना नदीपात्रातून अवैध वाळू चोरली जात असल्याची माहिती गायकवाड यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शिवना नदीपात्रात त्यांना एका टिप्परमध्ये जेसीबीच्या साह्याने वाळू भरताना पाहायला मिळाली. पण पथक पोहचताच टिप्पर चालक पळून गेला. मात्र त्याचवेळी तेथे एक जेसीबी आढळून आला.

पथक जेसीबी ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच तिथे मुळे नावाचा व्यक्ती आला आणि त्याने महसूल पथकाला जेसीबी ताब्यात घेण्यापासून रोखले. तर सोबत आणलेल्या एका व्यक्तीला थेट अंगावर जेसीबी घालण्याच्या सूचना दिल्या आणि तहसीलदार यांच्या दिशेने जेसीबीची सोंड जोरजोराने फिरवली. यावेळी जीव वाचवण्यासाठी पथक पळत असताना पुन्हा त्यांना जेसीबीची सोंडने चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र कसेबसे जीव वाचवून पथकाने पळ काढला.

राजकीय पाठबळ…

वाळूला सोन्याचं भाव मिळत असल्याने अवैध वाहतूक अधिक वाढली. त्यात शासकीय टेंडर कुणी घेत नसल्याने अवैध वाहुतक अधिक वाढली. तसेच राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने या लोकांची हिम्मत अधिक वाढली आहे. हप्ते देऊन अवैध वाहतूक करू द्या अन्यथा अशाप्रकारे हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वाळूमाफियांकडून सतत सुरू आहे.

Related Articles

Back to top button