Search
Close this search box.

नितेश राणेंना मोठा दिलासा; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. हा नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यापूर्वी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी कणकवली दिवाणी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करुन जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नितेश यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजते. दोषारोप पत्र दाखल होइपर्यंत नितेश राणे यांना कणकवलीत येण्यास बंदी असेल. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. नितेश राणे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप होता. याप्रकरणातील मुख्य आरोप सचिन सातपुते याचा नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचे अनेक पुरावे सरकारी पक्षाने सादर केले होते. त्यामुळे नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी भूमिगत व्हावे लागले होते. अखेर तीन आठवड्यानंतर नितेश राणे समोर आले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना १० दिवसांत आत्मसमर्पण करत नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी झालेल्या सुनावणीत नितेश राणे यांनी आत्मसमर्पण न केल्याने सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दिवाणी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता.
admin
Author: admin

और पढ़ें