वानखेडे प्रकरणी पुढील आठवड्यापर्यंत ‘नो ट्वीट्स’; नवाब मलिकांची कोर्टात हमी
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पुढील सुनावणीपर्यंत ज्ञानदेव वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची मुंब…
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई हायकोर्टाने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात बोलण्यास मनाई केली आहे. नवाब मलिक यांनीही वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणार नाही, अशी हमी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करणारा आदेश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने फेटाळल्याने त्याला समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी बुधवारी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर अपिलाद्वारे आव्हान दिले होते. त्या अपिलावर आज सुनावणी पार पडली. यावेळी पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्ते ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरोधात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सार्वजनिक करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आली आहे.
प्रतिवादी हे मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीने वागायला हवे. त्यांनी यापूर्वीही अनेकांची बदनामी करणारी विधाने केली आहेत. जेव्हा कोणतीही व्यक्ती माहितीची वाजवी खातरजमा न करता ती सार्वजनिक करते तेव्हा ते सत्य परिस्थितीकडे पाठ करण्यासारखे असते, असं म्हणणं वानखेडे यांच्यामार्फत वकील बिरेंद्र सराफ यांनी कोर्टासमोर मांडलं होतं. कोणालाही कोणावरही चिखलफेक करण्यास परवानगी दिली जाऊ शकते का? सोशल मीडिया हे बेछूट आरोप आणि बेताल वक्तव्ये करण्याचे माध्यम झाले आहे?, असेही सवाल यावेळी त्यांनी कोर्टासमोर उपस्थित केले होते.
वानखेडे यांच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांनतर कोर्टानं नवाब मलिक यांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मलिक यांनी कोणत्याही मंचाकडे तक्रार केली होती का? नसेल केली तर ट्वीट करून ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते? की हे केवळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायल? जातीच्या दाखल्याबाबत काही तक्रार होती तर त्याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी विशिष्ट मंच आहे. त्यांना दररोज मीडियामध्ये अशी काय प्रसिद्धी हवी आहे? विशेषत: त्यांच्या जावयाच्या अटक प्रकरणानंतर हे कसे?, असे सवाल हायकोर्टानं उपस्थित केले आहेत.
हायकोर्टाने उपस्थित केलेल्या सवालांवर उत्तर देताना, जावयाच्या अटक व सुटकेनंतर मलिक यांनी ट्विट सुरू केले नाही. आर्यन खान प्रकरणानंतर सुरू केले, असे उत्तर नवाब मलिक यांचे वकील तांबोळी यांनी दिलं आहे. त्यावर हायकोर्टानं आर्यन खानच्या प्रकरणाचा याच्याशी काय संबंध? आणि मंत्री म्हणून त्यांना असे करणे योग्य ठरते का?, असा सवाल केला आहे.
दरम्यान, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पुढील सुनावणीपर्यंत ज्ञानदेव वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची मुंबई हायकोर्टात हमी दिली आहे. तसंच, ज्ञानदेव वानखेडे यांच्या अपिलावर पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.