देश

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नाराजीनाट्य? ‘त्या’ व्हायरल मेसेजमुळ गोंधळाचे वातावरण

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता असतानाच आझाद मैदानात मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला वेगळं वळण लागलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच, आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसोबतही हे दोन्ही नेते उपस्थित होते. मात्र, एका व्हायरल मेसेजमुळं या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर संशयाचे वातावरण निर्माण झालं होतं.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत काल गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली त्यावेळीस विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर आज पुन्हा चर्चा होणार आहे. मात्र, चर्चेला जाण्यापूर्वीच आझाद मैदानात नाराजीनाट्य रंगले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरलं होतं. दोन्ही नेते मॅनेज झाल्याचा आरोप, या मेसेजमधून करण्यात येत आहे. या मेसेजनंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्ही चर्चेला जायचं की घरी हे तुम्ही ठरवा. तुमचा विश्वास नसेल तर आम्ही घरी जातो, असं यावेळी त्यांनी सांगितलं. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी खोत व पडळकर यांना अडवलं व मैदानाबाहेर जाऊ दिलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

Related Articles

Back to top button