भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीने पक्षाला केला रामराम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Srabanti Chatterjee) हिने गुरुवारी पक्ष सोडला. तिने राज्य विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे दिग्गज उमेदवार पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
श्राबंती चॅटर्जी हिने भाजप का सोडले?
भारतीय जनता पक्ष (BJP) पश्चिम बंगालसाठी काम करण्यास गंभीर नाही, असे कारण देत अभिनेत्रीने आपला राजीनामा दिला. जोरदार प्रचार करूनही ममता बॅनर्जी यांना राज्यात सत्तेतून हटवण्यात अपयश आल्यापासून श्राबंती चॅटर्जी भाजपपासून दूरच होत्या. श्राबंती चॅटर्जीने ट्विट केले की, ‘मी ज्या पक्षाच्या तिकिटावर मी मागची निवडणूक लढवली होती त्या पक्षाशी माझा संबंध संपवत आहे. पश्चिम बंगालचा मुद्दा पुढे नेण्यात पक्षाच्या पुढाकाराचा अभाव हे माझ्या निर्णयाचे कारण आहे.
पक्षाला फरक नाही : भाजप
भाजपने म्हटले की, आम्हीला काहीही फरक पडत नाही. भाजप पश्चिम बंगाल युनिटने अभिनेत्रीचा पक्ष सोडण्याचा निर्णय स्विकारला आहे. आणि असा दावा केला की, त्यामुळे पक्षाला फारसा फरक पडणार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले, ‘निवडणुकीनंतर त्या पक्षासोबत होत्या की नाही हे मला माहीत नाही. त्याचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही.
तथागत रॉय यांनी यापूर्वीही केला होता विरोध
मजुमदार यांच्या विधानाचा पुनरुच्चार करत भाजप नेते तथागत रॉय म्हणाले की, जे झाले ते चांगले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी रॉय यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर निशाणा साधला आहे. रॉय यांनी पक्षात कोणताही राजकीय आधार नसलेल्या आणि विशेषत: मनोरंजनाच्या जगातून आलेल्या लोकांचा समावेश करण्यावर टीका केली होती. पक्षाच्या विश्वासार्ह कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षाचाही त्यांनी निषेध केला.
मेघालय आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल म्हणाले, ‘आम्हाला मुक्ती मिळाली हे चांगले आहे. त्यांनी पक्षासाठी काही योगदान दिल्याचे आठवत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे एकेकाळचे निकटवर्तीय असलेले चॅटर्जी यांनी या वर्षी मार्चमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पार्थ चॅटर्जी यांच्याकडून तिचा 50,000 हून अधिक मतांनी पराभव झाला.