मुंबईत रविवारचा मेगा ब्लॉक, विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकात थांबा नाही
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 ते दुपारी 3.36 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
ठाणे येथून सकाळी 10.37 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
त्याचप्रमाणे चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे, गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पनवेल, बेलापूर, वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल अणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.