OBC RESERVATION : आरक्षण मिळालं नाही तर… पंकजा मुंडे यांचा मविआ सरकारला इशारा
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये भाजपाचा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती असल्याचं खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संपुष्टात आलं, 50 टक्क्यांच्या खालचं आरक्षणही संपुष्टात आलं अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
बहुजन कोण जो शोषित तो बहुजन, जे शोषित वंचित आहे त्यांना प्रवाहात आणायचं आहे, हे सरकार आल्यावर आमचं आरक्षण संपुष्टात आलाय, हे दुर्दैवी असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बहुजनांची व्याख्या खराब करण्याचे षडयंत्र सुरुय, मराठा समाजाच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसण्याचे काम या सरकारने केले आहे असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी सरकारवर केला.
मराठा समाजाची शैक्षणिक आरक्षणाची मागणी आहे आणि ओबीसी समाजाची राजकीय आरक्षणाची मागणी आहे आणि ते मिळायला हवं, जातीपातीचं राजकारण आजच्या तरुणांना मान्य नाही, राज्यात बहुजन, ओबीसींची परवड सुरु आहे, तुम्ही हा अध्यादेश टिकवून दाखवा, आणि या अध्यादेशाच्या आधारावर येणाऱ्या निवडणुका घ्या मग आम्ही तुमचंही कौतुक करु असं आवाहन पंकजा मुंडे यांनी सरकारल केलं.
अनेक गावांत अजूनही जातीच्या भिंती संपुष्टात आला नाही, अजूनही ही दरी दिसतेय, खरंच हा छत्रपती शिवराजांचा महाराष्ट्र आहे का? आंबेडकरांचा, फुलेंचा महाराष्ट्र आहे का? असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडे यांनी या राज्यात ओबीसी, बहुजन समाजाची परवड सुरु असल्याचं म्हटलं आहे.