देश

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत; येत्या काही दिवसात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाटप

राज्यातील पूरस्थितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीला दिल्या जाणाऱ्या मदतीची त्यांनी माहिती दिली. ‘राज्यातील 6-7 जिल्ह्यांमध्ये मोठी अतिवृष्टी झाली आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, अमरावती या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे लोकांच्या घर, शेती, दुकाने आदींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. राज्य सरकार मदतीचे धोरण लवकच जारी करणार आहे. काही तातडीची मदत आणि नंतर सर्व नुकसानीची माहिती घेऊन मदत देणार आहे.’ असे पवार यांनी यावेळी म्हटले.

‘माळीन गावातील दुर्घटना, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी राज्याच्या प्रशासन यंत्रणेने तिथल्या लोकांना मदत केली होती. त्यांची घरे आणि इतर उत्पन्नाची साधने पुन्हा उभी करण्यात आली होती.

सध्या अंदाजित 16 हजार कुटूंबांचे मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान मोठे आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून घरघुती भांड्यांचे 16 हजार किट वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय एक चटई आणि दोन चादरींचे 16 हजार किटसुद्धा वाटप करण्यात येणार आहे. या किटसोबतच कोरोनाप्रतिबंधक मास्कसुद्धा पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणार आहे.’ अशी माहिती पवार यांनी दिली.

‘याशिवाय राष्ट्रवादी पक्षातर्फे वैद्यकिय सेवा देण्यासाठी डॉक्टर तसेच औषधांचीसुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. ही मदत येत्या 2-3 दिवसात लोकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. साधारण या सर्व मदतीची किंमत अडिच कोटींच्या आसपास असल्याचेही’ पवार यावेळी म्हणाले.

Related Articles

Back to top button