देश

Mumbai Local Train: आतापर्यंत खूप सहन केलं; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई:करोना लॉकडाउन विशेषत: लोकल बंदीमुळं हैराण झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या संतापाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाचा फोडली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं असून मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local Train) तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे. ‘सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केलं, आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे,’ असा इशाराही राज यांनी पत्रातून दिला आहे. (Raj Thackeray Writes to CM Uddhav Thackeray)

राज ठाकरे यांचं पत्र त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आलं आहे. ‘अद्यापही लागू असलेल्या करोनाच्या निर्बंधांबाबत राज यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुंबई शहरासाठी घेतले जात असलेले निर्णय अनाकलनीय असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नसल्यानं त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागत आहे. लोकांचे अतोनात हाल होत आहेत. बस सेवेला परवानगी दिली असली तरी लोकल बंद असल्यामुळं बसमध्ये प्रचंड गर्दी होतेय. अशा गर्दीत रोग पसरण्याचा धोका अधिक आहे,’ याकडं राज यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

‘मुंबईतील लोकल सेवा तातडीनं सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवीत. लोकांनी आतापर्यंत खूप सहन केलंय आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे. यापुढं सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत मनसे मुंबईकरांसोबत उभी राहील आणि लोकल सुरू करण्यासाठी आंदोलन करेल,’ असं राज यांनी म्हटलं आहे. ‘मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीनं सुरू करा,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

सरकारला टाळेबंदीशिवाय काही सुचत नाही का?

‘ही साथ एकाएकी जाणार नाही हे गृहित धरून आता सरकारनं उपाययोजना व धोरणा आखण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढवतानाच धोरण आखण्यात अधिक कल्पकता असणं गरजेचं आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारला टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडं काही सुचतच नाही अशी स्थिती आहे,’ असा त्रागा राज यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button