देश

विश्वविक्रमी दहीहंडी होणार! मनसे दहीहंडी साजरा करण्यावर ठाम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यात सर्वच सण आणि उत्सवांवर निर्बंध आले आहेत. गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नव्हता. पण यावर्षी मनसेने (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करण्याचा निर्धार केला आहे.

मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. ‘विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणारच!!! असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं असून त्याखाली मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांची नावं आहेत.

‘महाराष्ट्रात मराठी सण आणि दहीहंडी साजरी करणारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील मुलं ही आनंदात जगली पाहिजेत, आणि आनंदात सण साजरा झालाच पाहिजे, आम्ही 31 ऑगस्टला ठाण्यात विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्याचं जाहीर करतो’ असं अभिजीत पानसे यांनी घोषित केलं आहे. यासाठी मनसेने गोविंदा पथकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. राज्यभरातील मोठमोठी दहीहंडी पथकं मुंबई ठाण्यात येत असतात, पण कोरोनामुळे गेल्यावर्षी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. पण आता कोरोनाच्या संकटात मनसेच्य़ा या भूमिकेमुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button