‘या’ कारणासाठी मनसेला केला रामराम, आदित्य शिरोडकर यांनी सांगितली ‘मन की बात’
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांनी काल मनसेला (MNS) सोडचिठ्ठि देत शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांनी हा निर्णय का घेतला याबाबत चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर झी मीडियाशी बोलताना आदित्य शिरोडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य शिरोडकर यांनी शिवबंधन हाती बांधलं. त्यांची कार्यपद्धत पाहून, त्यांचं काम पाहून, प्रेरित झालो आणि हा निर्णय घेतला. यापुढे आयुष्यभर जे समाजकार्य करु ते शिवसेनेमार्फतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करु असं आदित्य शिरोडकर यांनी म्हटलं आहे.
‘मनसे सोडण्याचा निर्णय हा काही एका दिवसात घेतलेला नाही, मागच्या अनेक वर्षांत असे अनेक प्रसंग आले. माझा निर्णय हा काही काल-परवा झालेला नाही.’ पण सगळ्याच गोष्टी मला मीडियासमोर सांगता येणार नाहीत. नेत्यांबरोबर मतभेद सुरू झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला असं आदित्य शिरोडकर यांनी म्हटलं आहे.
मनसेतले पदाधिकारी, मनविसेतले कार्यकर्ते बरीच लोकं संपर्कात आहेत, त्यांच्याबद्दल शिवसेना संघटनेत वरिष्ठांशी बोलून ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढची भूमिका ठरवू असा दावाही आदित्य शिरोडकर यांनी केला आहे.
शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही तर समाजसेवा ध्यानात ठेवूनच घेतलाय, पक्ष यापुढे जी काय जबाबदारी देईल त्यावर काम करु असं आदित्य शिरोडकर यांनी स्पष्ट केलं आहे.