देश

राज्यात तोक्ते वादळामुळे हाय अलर्ट आणि पोलीस महासंचालक चंदीगडला सुट्टीवर? शिवसेनेचा आक्षेप

राज्यावर तोक्ते वादळाचं संकट घोंघावत असताना पोलीस महासंचालक चंदीगडला सुट्टीसाठी गेले असल्याची बातमी आहे. कुणाचीही परवानगी न घेता पोलीस महासंचालक संजय पांडे चंदीगडला रवाना झाल्याची माहिती मिळत असून त्यावर आता शिवसेनेने सवाल विचारला आहे. राज्यात वादळामुळे हाय अलर्ट जारी केला असताना पोलीस महासंचालक चंदीगडला कसे गेले असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

राज्यात तोक्ते वादळाचं संकट असताना मुंबई, कोकण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा वेळी पोलीस महासंचालक राज्याच्या गृहमंत्र्यांची परवानगी न घेता, त्यांना न विचारता चंदीगडला गेले असा दावा शिवसेनेने केला आहे. राज्याचे गृहमंत्री ज्यावेळी या वादळाचा आढावा घेण्याकरता संजय पांडेंना फोन करतात तेव्हा त्यांना समजते की पोलीस महासंचालक हे मुंबईत नसून चंदीगडला आहेत. आता यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.

संजय पांडे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय की त्यांनी संबंधित विभागाला तशी माहिती दिली होती आणि अधिकृत सुट्टी मिळाल्यानंतरच ते चंदीगडला गेले.

संजय पांडे यांच्या दिल्लीतील लोकांशी भेटी?
संजय पांडे यांनी या दोन दिवसात दिल्ली आणि चंदीगडमधील काही लोकांच्या भेटी घेतल्या आहेत आणि त्या येत्या काळात महाविकास आघाडीवर आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या असतील अशी कुजबुज सध्या सुरु आहे. त्यामुळे त्यांच्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेतून जोर धरु लागली आहे.

याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य शिवसेनेकडून आले नसले तरी आज संध्याकाळ वा उद्या पर्यंत याबाबत शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईपासून 150 किमी अंतरावर खोल समुद्रात केंद्र असणाऱ्या तोक्ते या वादळाने आता उत्तरेकडे वळण्यास कूच केली आहे. मुंबईला हे वादळ धडकलं नाही. पण, याचे परिणाम मात्र शहरावर दिसून आले. वादळी वाऱ्यामुळं अनेक भागांत झाडं कोसळण्याच्याही घटना घडल्या.

Related Articles

Back to top button