देश

धक्कादायक घटना, दोन डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

राज्यभरात कोरोनाचा थैमान सुरुच आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाचा उद्रेक अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बेडही अपुरे पडू लागले आहे. अशीच परिस्थिती सध्या कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरात पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाने डॉक्टरांनाच गाठले आहे. कोरोनाने दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कल्याण पश्चिम गांधारी रोड परिसरात राहणाऱ्या दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नागेंद्र मिश्रा आणि त्यांचा मुलगा सुरज मिश्रा अशी दोन्ही डॉक्टरांची नावे आहेत .नागेंद्र मिश्रा यांचे टिटवाळा जवळ खडवली येथे क्लिनिक तर सुरज यांचे बापगाव परिसरात क्लिनिक आहे. त्याठिकाणी ते आपली सेवा बजावत होते. मात्र, त्यांना कोरोनाने गाठले.

सहा दिवसांपूर्वी दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने नागेंद्र यांना ठाण्यातील वेदांत रुग्णलयात तर सुरज मिश्रा याना मुंबई गोरेगाव येथील खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने या दोघांचा काल मृत्यू झाला. गेले वर्षभर या दोन्ही डॉक्टर बाप लेकांनी कोरोना रुग्णांची सेवा केली. मात्र अखेर त्यांना कोरोनाने गाठले. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाची परिस्थती बिकट

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत कोरोनाची परिस्थती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दिवसाला दीड हजारच्या आसपास रुग्ण सापडू लागल्याने प्रशासनाची आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. केडीएमसी प्रशासनाकडून 6572 खाटाची व्यवस्था केली असली तरी आज व्हेंटीलेटर, आयसीयूच्या रिकाम्या खाटा फुल्ल झाल्या आहेत. यामुळेच कोरोनाच्या कहरापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांनी शक्य असल्यास होम क्वारटाईन व्हावे, रुग्णांना लागणाऱ्या औषधाचे कीट तातडीने रुग्णाला घरपोच दिले जाईल असे आवाहन पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Back to top button