देश

शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल

लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला (Maharashtra Bandh) भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) विरोध केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेवर जोरदार तोफ डागली आहे. ‘मनसेचा लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येला पाठिंबा आहे का?,’ असा रोकडा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज मुंबईतील हुतात्मा चौकात शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मीडियाशी बोलताना बंदला विरोध करणाऱ्या भाजप व मनसेवर मलिक यांनी कडाडून टीका केली. ‘लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच, पण मनसेचंही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे असं दिसतंय. ‘महाराष्ट्र बंद’ला विरोध करून मनसे हेच सांगू पाहतंय का, असा सवाल मलिक यांनी केला.

‘केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं आहे. त्याला अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.
‘महाराष्ट्र बंद’ मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेनं चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्यानं सांघिक बंद यशस्वी झाला आहे,’ असा दावा मलिक यांनी केला. ‘विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. हिंसेचं समर्थन होणार नाही. शांततापूर्वक पद्धतीनं हे आंदोलन पुढं घेऊन जायचं आहे, असं आवाहन नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केलं.

Related Articles

Back to top button