मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक असलेल्या लिलावती रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्र्यातील या प्रसिद्ध रुग्णालयात काळी जादू केल्याचा आरोप केला जात आहे. लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे काळी जादू केल्याचे काही पुरावे सापडल्याचंही विश्वस्तांचे म्हणणं आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयातच उपचार सुरू होते. त्यामुळं हे रुग्णालय चर्चेत आले होते. मात्र आता पुन्हा एकदा या रुग्णालयाची चर्चा होताना दिसत आहे. रुग्णालयाचे सध्याचे विश्वस्त बोर्डाने माजी ट्रस्टींविरोधात परिसरात काळी जादू केल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयात त्यांना हाडे आणि मानवी केस असलेले कलश सापडले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र FIR दाखल करुन घेतली नसल्याने ट्रस्टींनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयातील सध्याचे ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी आरोप केला आहे की, काही कारणांनंतर त्यांना काळी जादू केल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी त्यांची आई चारू मेहता आणि अन्य ट्रस्टींच्या केबिनच्या फरशांचे खोदकाम केले. रुग्णालयातील इंजिनिअर विभागाकडून हे काम करुन घेण्यात आली. त्यानंतर फरशीखाली काळी जादू करण्यासाठी असलेले साहित्य सापडले आहे. मानवी हाडे आणि केस असलेले आठ कलश सापडून आले आहेत. या सर्व प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
लिलावती रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली हे सर्व कलश आढळून आले आहेत. विश्वस्तांनी या प्रकरणाबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात वांद्रे कोर्टाचं दार ठोठावलं आहे. कोर्टाने याची दखल घेतली आहे. कोर्टाकडून या प्रकरणात तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
लीलावती रुग्णालयात घोटाळा?
मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप हॉस्पिटलचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. त्यांनी हॉस्पिटलच्या माजी विश्वस्तांनीच ही अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुरवठादार कंपन्यांशी हातमिळवणी करून जुन्या विश्वस्थांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
