शनिवारी आणि रविवारी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करताय का तर, जरा लोकलचे वेळापत्रक पाहून घ्याच. मध्य रेल्वेवर 10 तासांचा तर पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचे आज मेगाहाल होण्याची शक्यता आहे. तसंच, काही लोकल फेऱ्यादेखील रद्द होणार आहेत. कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक जाणून घेऊया.
पश्चिम रेल्वेने ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान पूल क्रमांक ५वरील गर्डरच्या कामासाठी अप-डाउन जलद मार्गावर १३ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. शनिवार रात्री १० वाजल्यापासून रविवार सकाळी ११ वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉकमध्ये १६८ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील १३ तासांच्या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील अप आणि डाउन जलद गाड्यांची वाहतूक अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. याच स्थानकातून परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. ब्लॉकमुळे शनिवारी रात्री १० ते रात्री १२ वाजेपर्यंत २६ आणि रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १४२ फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे
स्थानक : ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल
– वेळ शनिवारी रात्री १० ते रविवारी स. ११
– मार्ग : अप आणि डाउन जलद
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने यापूर्वीच सीएसएमटी ते भायखळा/वडाळा रोड या दरम्यान १० तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. सीएसएमटीतील फलाट क्र. १२-१३ च्या विस्तारासाठी सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोडदरम्यान १० तासांचा ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५ पर्यंत असलेल्या ब्लॉकमध्ये ५९ लोकल रद्द राहणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते भायखळा / वडाळा रोड
-वेळ : शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी स. ९.१५
– मार्ग : अप-डाउन धीमा/जलद आणि हार्बर अप-डाउन
