पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेट एस टी स्टँड आवारात ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही सर्व घटना मंगळवारी मंगळवारी रात्रीच घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पीडित तरुणी ही स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तेव्हा आरोपींनी तरुणीला फलटणला जाणारी बस आहे असं सांगून दुसऱ्या बसमध्ये जायला सांगितले. तिथेच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीचे वय 36 वर्षे इतके असून त्याच्यावर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.
स्वारगेट परिसरात नेहमी बऱ्यापैकी वर्दळ असते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा या परिसरातील गर्दी कमी झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येतंय. रात्री महिला शिवशाही बसच्या जवळून जात असताना तिला आरोपीने बळजबरीने आत ओढून घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. मात्र, या प्रकारामुळं पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासदेखील पोलिस करत आहेत.
जामिनावर सुटलेला आरोपी
आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असं असून तो जामिनावर सुटलेला आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाले आहेत.
