देश

Chandrayaan 3 प्रक्षेपणापूर्वी शास्त्रज्ञांचे शिर्डीत प्रतिकृती पूजन, संस्थानाचा गौप्यस्फोट

भारताची चंद्र मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी देशभरातील नागरिकांकडून ठिकठिकाणच्या देवालयांत पूजा-प्रार्थना करण्यात येत होत्या. शिर्डीत मात्र खुद्द या मोहिमेतील शास्त्रज्ञांनीच येऊन चांद्रयान ३ ची प्रतिकृती साईचरणी ठेवून पूजा केली होती, असा गोप्यस्फोट करण्यात येत आहे.

चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी १ जुलैला प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर के. कल्पना यांनी शिर्डीत येऊन पूजा केल्याचे शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनी आता सांगितले आहे. मोहीम यशस्वी झाल्यानंतर शिर्डीत जल्लोष करण्यात आला. तसेच संस्थानतर्फे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यावेळी सिवा शंकर यांनी ही माहिती उघड केली. याची छायाचित्रेही सादर करण्यात आली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) राबविण्यात आलेली चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर देशभर जल्लोष करण्यात आला. तसाच जल्लोष शिर्डीतही झाला. मात्र, यावेळी या मोहिमेपूर्वी शास्त्रज्ञांची गोपनीय शिर्डी भेट उघड करण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनीच ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर के. कल्पना यांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधी मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले होते. चंद्रयान ३ ची प्रतिकृती साईचरणी ठेऊन पूजा केली होती. साई संस्थानकडून यावेळी वीर मुथुवेल यांच्याकडे साईबाबांचा प्रसाद देऊन चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण होण्यासह त्याचे यशस्वी लँडिंग व्हावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या, असेही सिवा शंकर यांनी सांगितले. मात्र, आजवर ही गोष्ट उघड झाली नव्हती.

मोहीम यशस्वी झाल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीच्या बैठकीत इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायाधीश तथा तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यरलगड्डा, जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सदस्य पी. सिवा शंकर व श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते. शिर्डी ग्रामस्थांनी आणि भाविकांनीही जल्लोषात या मोहीमेचे यश साजरे केले.

Related Articles

Back to top button