Mumbai Rains : मुसळधार पावसामुळं मुंबईतील सखल भाग जलमय; वाहतुकीचे ‘हे’ मार्ग बंद
साधारण तीन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आणि अचानकच शहरातील नागरिकांना उन्हाचा दाह सोसून दिल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत काळ्या ढगांची दाटी झाली आणि शुक्रवारी पहाटेपासूनच ते बरसू लागले. मुंबई, ठाणे, कल्याणसोबतच नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. दिवस उजाडूनही शहरात पावसामुळं झालेला काळोख अद्यापही कायम असून, पुढील काही तास किंबहुना दिवसभर हीच परिस्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान पहाटेपासून सुरु झालेल्या या पावसामुळं लगेचच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आणि याचे थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर झाले. अनेर भागांमधील वाहतूक मंदावली. तर, काही ठिकाणी वाहतूक विभागाकडूनच पर्यायी मार्ग सुरु करण्यात आले. माटुंगा येथील किंग्ज सर्कल परिसरात पावसामुळं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर तिथे अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली येथे पावसाची जोरदार हजेरी असल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळं अंधेरी सब वे वाहतुकीससाठी बंद ठेवण्यात आला आहे. दहिसर पूर्व वेस्टन एक्सप्रेस हायवेवर सवबेमध्येही पाणी साचल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वेवरही पावसाचा परिणाम दिसत असून, मध्य रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिरानं धावत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये सध्या वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्यामुळं नोकरीवर निघालेल्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. पुढील तीन ते चार दिवसांसाठी शहरात हीच परिस्थिती राहून पाऊस तूर्तास काढता पाय घेणार नसल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, राज्यात पुढील 5 दिवस पावसाच्या असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
इथं मुंबईत पावसानं जोर धरलेला असतानाच शहरातील नागरिकांसह काही पर्यटकांनी शहरातील समुद्रकिनारे गाठण्यास सुरुवात केली आहे. पण, समुद्राला आलेलं उधाण पाहता नागरिकांना किनारपट्टी भागापासून दूर राहण्याचं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.
हा वीकेंड पाऊस गाजवणार…
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचे आहेत. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासोबतच राज्यातील घाटमाथ्यावरील भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. असं असलं तरीही राज्याचा काही भाग मात्र अद्यापही चांगल्या पावसापासून वंचित आहे. त्यामुळं या भागातील बळीराजा आता आभाळाकडे डोळे लावून असल्याचं पाहायला मिळत आहे.