अजितदादांच्या ‘पॉवर’फूल एन्ट्रीमुळे शिंदे गटाचे आमदार भिडले! भांडण मिटवण्यासाठी CM शिंदे नागपूरातून थेट मुंबईत
राष्ट्रवादीतून (NCP) बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांची थेट उपमुख्यमंत्रीपदी आणि त्याच्यासोबत आलेल्या नऊ आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने शिंदे गटातले (Shinde Group) आमदार आणि खासदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि नऊ आमदारांचा अचानक मंत्रिमंडळात समावेश केल्याने शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यावरुनच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी संध्याकाळी बाचाबाची आणि झटापट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना थेट नागपूर दौरा सोडवण्यासाठी मुंबईत यावं लागलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी शिवसेनेचे शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांशी भिडले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूरहून मुंबईचा अधिकृत दौरा सोडून मंगळवारी मुंबईत परतावे लागले. याच दिवशी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्यात अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 मंत्र्यांचाही समावेश होता. त्यानंतरच अर्थखाते अजित पवार यांच्याकडे दिले जात असल्याचे ऐकायला मिळत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच बैठकीनंतर मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. या दोन आमदारांमधील भांडण मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना अचानक आपला नागपूर दौरा सोडून मुंबईत यावे लागले. बुधवारी सायंकाळपर्यंत या दोन आमदारांची मनधरणी करण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांना करावे लागले. एक वर्ष मंत्रीपद भूषविणाऱ्यांना हटवून मंत्री करावे, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली आहे. सरकारमध्ये तिसऱ्या पक्षाच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची अस्वस्थता वाढली आहे.
नेमकं काय घडलं?
गेले अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असतानाच अचानक अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यामुळे आता शिंदे गटातील आमदारांच्या मंत्री होण्याचा अपेक्षा मावळल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी वर्षभर मंत्री असलेल्यांनी आता दुसऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी शिंदे गटातील काही आमदारांनी केली आहे. त्यातूनच मोठा वाद निर्माण झाला. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संध्याकाळी मंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर हा वाद इतका किरकोळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुणीही नाराज नाही – उदय सामंत
या सगळ्या प्रकारानंतर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भाष्य केले आहे. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे आमदार किंवा खासदार नाराज नाहीत. आमचा एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झालेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती झाल्याने किंवा ते महायुतीमुळे आल्याने शिंदे गटात नाराजी आहे अशी काहीही चर्चाही झालेली नाही. कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली.