Forbes: मुकेश अंबानी पुन्हा आशिया ‘किंग’, पण संपत्तीत कमालीची घट; गौतम अदानींची स्थिती काय?
भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे नाव पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाले असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. प्रतिष्ठित संस्था फोर्ब्सने मंगळवारी जारी केलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती ८३.४ अब्ज डॉलर असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत ९व्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे याआधीही मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला होता. दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वीपर्यंत जगातील तिसरे सर्वात श्रीमंत असलेले गौतम अदानी आता २४व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
फोर्ब्स श्रीमंतांची यादी
जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी एक पायरी चढली असून गेल्या वेळी ते १०व्या क्रमांकावर होते. मात्र, लक्षणीय आहे की यंदा अंबानींच्या संपत्तीत घट झाली आहे. गेल्या वेळी त्यांची अंदाजे मालमत्ता $९०.७ अब्ज होती, तर यंदा त्यांची एकूण संपत्ती $८३.४ अब्जावर घसरली आहे. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, गुगलचे सर्जे ब्रिन आणि डेलचे मायकेल डेल यांसारख्या उद्योगपतींना मागे टाकले आहे.
फोर्ब्सने म्हटले की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज $१०० अब्ज पेक्षा जास्त महसूल कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. रिलायन्सचा व्यवसाय तेल, दूरसंचार रिटेलपर्यंत पसरलेला आहे.
गौतम अदानींची पिछाडी
हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून एकावेळी जगातील तिसरे श्रीमंत असलेल्या गौतम अदानींना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष आता श्रीमंतांच्या तिसऱ्या क्रमांकावरून थेट २४व्या स्थानावर फेकले गेले आहेत. मात्र, अदानी अजूनही देशातील दुसरे श्रीमंत असून त्याच्याकडे एकूण ४७.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तसेच HCL चे शिव नाडर भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती सुमारे $२५.६ अब्ज आहे. नाडर हे जगातील श्रीमंतांच्या यादीत ५५व्या क्रमांकावर आहेत.
फोर्ब्सच्या यादीत कोणत्या भारतीयांचा समावेश
शिव नाडर $२५.६ अब्ज
सायरस पूनावाला $२२.६ अब्ज
लक्ष्मी मित्तल $१७.७ अब्ज
सावित्री जिंदाल $१७.५ अब्ज
दिलीप सांघवी $१५.६ अब्ज
राधाकृष्ण दमानी $१५.३ अब्ज
कुमार मंगलम बिर्ला $१४.२ अब्ज
उदय कोटक $१२.९ अब्ज