ऐन दिवाळीत महागाईचा भडका, पुणे-नाशकात डिझेल शंभरी पार तर रिक्षा प्रवास महाग
महागाईचा दिवसागणिक भडका वाढताना दिसत आहे. मुंबईनंतर आता पुणे आणि नाशिकमध्ये डिझेलने शंभरी ओलांडली आहे. आज पुण्यात डिझेल 100 रूपये ८ पैसे झाले आहेत. तर पेट्रोल 110 रूपये 92 पैसे आहे. डिझेल, पेट्रोल महागाईमुळे सर्वसामान्य होरपळले आहेत. तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षा प्रवास 2 रूपयांनी महागणार आहे. (Pune Rickshaw travel) नवीन भाडेवाढ 8 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. (Diesel Price hike in Pune and Nashik)
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे महागाई गगनाला भिडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असताना आज डिझेलनेही शतकाचा टप्पा गाठला आहे. पुण्यामध्ये आज डिझेलच्या वाढत्या किमतीने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. येथे डिझेल 100.08 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.
दरम्यान, पुण्यात रिक्षांचे दर वाढलेत. आठ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू करण्यात आलेत. पहिल्या दीड किमीसाठी २० रूपये तर पुढील प्रत्येक किमीसाठी 13 रूपये दर असेल. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाड पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीच्या हद्दीत लागू होणार आहे. मीटर कॅलिब्रेशनसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नाशिकमध्येही डिझेल शंभरी पार झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलचे दर देखील 100रुपये पार गेले आहेत. डिझेलचा दर नाशिक शहरात 100 रुपये 27 पैसे तर पेट्रोलचा दर 111 रुपये अठरा पैशांवर पोहोचला आहे. ऐन दिवाळीत इंधनाच्या वाढीव दरांनी महागाईला अधिकच तीव्र केली आहे.