24 तासांत मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाच आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या चोवीस तासांत मुंबईसह कोकण आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भासह तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर गेले वीस दिवस पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
या नंतर आता पुन्हा हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि नाशिक जिह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला पाऊस होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असल्यानं येत्या काही तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे