कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातून आजपासून वाहतूक सुरु
कोकणात मोठ्या प्रमाणात पावसाने तडाखा दिला. (Rain In Konkan) 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद असलेला कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील ( Kolhapur – Ratnagiri road) आंबा घाट ( Amba Ghat) आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. ( Amba Ghat traffic from today) गेले दहा दिवस हा घाट बंद होता. दरडी बाजूला हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हलक्या आणि लहान वाहनांसाठी हा मार्ग आजपासून सुरु करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला आंबा घाट अतीवृष्टीमुळे रस्ता खचल्यामुळे आणि दरडी कोसळल्यामुळे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. 11 दिवस बंद असलेल्या हा घाट रस्ता आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. आंबा घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनचा वापर करून रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले आणि आता तो वाहतुकीला सुरु झालाय.
आंबा घाट बंद असल्याने वाहतूकदारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. सध्या अत्यावश्यक सेवेची वाहतूक आंबा घाट बंद असल्याने अणुस्कुरा मार्गे सुरू आहे. त्यामुळे आधीच इंधन दरवाढ आणि त्यात हे वाढणारे अंतर यामुळे नुकसान होत आहे. आंबा घाट हा कोल्हापुर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा सर्वात सुरक्षित आणि जवळचा महामार्ग आहे.
दरम्यान, हा घाट बंद झाल्याने आंबा घाटाला पर्यायी म्हणून ओणी, पाचल व्हाया अणूस्कुरा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथून गगनबावडा घाट तसेच तळेरे येथून वैभववाडी मार्गे जाणारा करुळ घाट किंवा नांदगाव तिठा येथून जाणारा फोंडा घाट तसेच कुभार्ली घाट हा कराड मार्गे जोडणारा घाट या मार्गे वाहतूक सुरु होती.
आंबा घाटाला पर्यायी मार्ग कुंडी घाट
आंबा घाटाला पर्यायी मार्ग म्हणुन संगमेश्वर तालुक्यातील कुंडी मार्गे पाटणला जोडणारा कुंडी घाट तयार व्हावा, याची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे. काही वर्षांपूर्वी कुंडी घाटाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, ते काम अर्धवट स्थितीत आहे. अनेकदा शासन दरबारी याप्रकरणी पाठ पुरावा केला होता. मात्र, या घाटाचे काम अद्याप हाती घेतलेले नाही. अतीवृष्टी मुळे आंबा घाट बद पडल्यानंतर कुंडी घाट होणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने सामोरे आले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या घाटाचा मार्ग मोकळा झाला तर सातारा – रत्नागिरी अंतर कमी होईल.