देश

मुंबईत सेना भवनासमोर राडा! भाजपच्या ‘फटकार’वर शिवसैनिकांचे ‘फटकारे’

सत्ता वाटपाच्या वादातून युती तुटल्यानंतर एकमेकांपासून दुरावलेले शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आज मुंबईत प्रथमच समोरासमोर आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळं दादरमध्ये तणाव असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Scuffle Between Shiv Sena-BJP Workers in Dadar, Mumbai)

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यावरून विरोधकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवर टीकेचा भडिमार केला आहे. शिवसेनेनंही यावरून भाजपवर निशाणा साधत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळं संतापलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा निषेध करण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनासमोर ‘फटकार मोर्चा’चं आयोजन केलं होतं. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाची माहिती मिळाल्यानं शिवसैनिक आधीच शिवसेना भवनासमोर जमले होते. संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली होती. भाजपचा मोर्चा शिवसेना भवनापासून बऱ्याच अंतरावर अडवण्यात आला व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन जात असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचवेळी, काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचंही बोललं जात आहे. तसा आरोप भाजपनं केला आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना काठीनं मारल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

Related Articles

Back to top button