कडक निर्बंधांसाठी तयार राहा; राजेश टोपेंचं जनतेला आवाहन
‘लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी,’ असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यात करोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. काल २७ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळं राज्य सरकार अधिक सतर्क झालं आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता करोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी कठोर निर्बंधांचा मार्ग अवलंबला जाणार आहे. राजेश टोपे यांनी आज तेच संकेत दिले. ‘गर्दी टाळणे हाच निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल होणारी जी काही ठिकाणं आहेत, याबाबतचं नियोजन केलं जात आहे. हे नियोजन अंतिम झाल्यावर त्याबाबतची माहिती देण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळलं जावं या दृष्टिकोनातून पावलं उचलावी लागणार आहेत. गरजेनुसार त्याबाबतचे आदेश निर्गमित केले जातात. यापूर्वी १५ मार्च आणि दोन दिवसांपूर्वी असे आदेश काढण्यात आले आहेत. करोना रुग्णांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोक असेच बेफिकिरीनं वागणार असतील तर निर्बंधांमध्ये कठोरता आणावीच लागेल,’ असं टोपे म्हणाले.
‘लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळं ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’, असंही टोपे यांनी सांगितलं.
राज्यात काल एकूण २७ हजार ९१८ करोना रुग्णांची नोंद झाली. तर, १३९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ कोटी ९६ लाख २५ हजार करोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी २७ लाख ७३ हजार ४३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईन असून १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, एकूण २३ लाख ७७ हजार १२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.