Menu

दुनिया
UN मधल्या भाषणाआधीच इम्रान खान यांनी मानली हार

nobanner

संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करण्याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हार मानली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे शुक्रवारी संध्याकाळी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भाषणाबद्दल मी फार आशावादी नाही. यातून फार काही साध्य होईल असे आपल्याला वाटत नाही असे इम्रान खान एका मुलाखतीमध्ये म्हणाले.

इम्रान खान संयुक्त राष्ट्रातील आपल्या भाषणात काश्मीर मुद्दावरुन भारताला लक्ष्य करणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून इम्रान खान यांनी भारताविरोधात आघाडी उघडली आहे. काश्मीर मुद्दावर आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यामुळे इम्रान खान यांनी याआधी सुद्धा आपली हताशा प्रगट केली होती.
काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रात अपेक्षित यश मिळणार नसल्यान ते निराश आहेत असे जिओ न्यूजने म्हटले आहे. “मी काश्मीरसाठी खास न्यूयॉर्कला आलो आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. आम्ही मोठया संकटाच्या दिशेने चाललो आहोत हे जगाला कळत नाहीय” असे इम्रान खान म्हणाले.

काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्याला निराश केले आहे. काश्मीरच्या जागी युरोपियन, ख्रिश्चन, ज्यू किंवा अमेरिकन नागरीक असते तरी आंतरराष्ट्रीय समुदायाची प्रतिक्रिया कशी असती याची नुसती कल्पना करा असे इम्रान खान दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. निर्बंध उठवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारवर कुठलाही दबाव नाही असे इम्रान यांचे म्हणणे आहे.

काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याचे आपण संयुक्त राष्ट्राला आव्हान करत राहू असे इम्रान त्यांच्या ताज्या मुलाखतीत म्हणाले आहेत. संयुक्त राष्ट्रासह वेगवेगळया देशांकडे पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा मुद्दा मांडत आहे. पण कलम ३७० हटवणे आणि जम्मू-काश्मीरचा विभाजन हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे भीक मागितलेली नाही
काश्मीर प्रश्नावर आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा कोणापुढेही भीक मागितलेली नाही असं स्पष्टीकरण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी दिलं. झालं असं की, संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने इम्रान खान यांना भारत आणि अमेरिकेची मैत्री तसंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देहबोली पाहता काश्मीर मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचं बाजू ऐकून घेतील असं वाटत नाही…अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार ? अशी विचारणा केली. इम्रान खान यांना हा प्रश्न व्यवस्थित ऐकू आला नाही. त्यांनी चुकून भीक मागणे असं ऐकलं. त्यांनी पत्रकाराला मी राष्ट्राध्यक्षांकडे भीक मागितली असं म्हणालात का असं विचारणा केली. पत्रकाराने नाही म्हणताच इम्रान खान म्हणाले, “ओह! थैक्स….मी कोणापुढेही भीक मागितलेली नाही”.