Menu

देश
सोलापूरमध्ये राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची चौकशी थंडच!

nobanner

राजकीय, सामाजिक, आर्थिक हितसंबंधांच्या आड येणाऱ्या एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा परस्पर काटा काढून त्याचे उभे आयुष्यच संपविण्याचा अधूनमधून घडणारा प्रकार महाराष्ट्रात नवीन नाही.  सोलापूर जिल्ह्य़ात करमाळा, अक्कलकोट व बार्शी हे तालुक्यांचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी नेहमीच असे राजकारण होत असते. हेच लोण आता सोलापूर शहरात पोहोचले असून त्यात सत्ताधारी भाजपच्याच एका ज्येष्ठ नगरसेवकावर हा प्रसंग उद्भवला आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकावर विषप्रयोग झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण चौकशीला अद्याप वेग आलेला नाही. यातूनच संशय बळावत गेला. सुरेश पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून ते १९९७ पासून महापालिकेवर निवडू येतात. महापालिकेच्या कामकाज पद्धतीचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. भवानी पेठेतील घोंगडे वस्ती भागातून लोकप्रतिनिधित्व करणारे पाटील हे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे बोट धरून भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले व स्वकर्तृत्वाने वाटचाल करीत राहिले. अलीकडे चार वर्षांत राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटबाजीने पक्षाला ग्रासले असताना सुरुवातीला सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांच्या विरोधात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे अनुयायी म्हणून ओळखले जायचे. परंतु थोडय़ाच दिवसात पालकमंत्र्यांशी त्यांची दिलजमाई होऊन ते सहकारमंत्र्यांची साथ सोडून पालकमंत्र्यांच्या गोटात सामील झाले आणि पुढे शहराच्या राजकारणात पालकमंत्री गटाची सूत्रेही त्यांच्या ताब्यात गेली.

एव्हाना, दोन्ही मंत्री देशमुखांच्या गटबाजीला एवढा ऊत आला की त्याचे प्रतिबिंब महापालिकेच्या राजकारणात विशेषत: महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरदेखील स्पष्टपणे जाणवत गेले. यात महापौरांसह सभागृहनेता व अन्य पदाधिकारी निवडीपासून ते पालिका सभागृहापर्यंत पदोपदी गटबाजी जाणवत गेली. पालकमंत्री विजय देशमुख यांनी महापालिकेशी संबंधित एखाद्या विकास प्रश्नावर बैठक बोलावली की त्या बैठकीपासून सहकारमंत्री गटाच्या महापौरांसह इतर दूर राहायचे आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अशाच प्रकारे एखाद्या विषयाशी निगडित बैठकीचे आयोजन केले असता त्याकडे पालकमंत्री गटाने बहिष्कार घालणे हे समीकरण ठरलेले असायचे आणि अजूनही हेच चित्र दिसून येते. प्रत्येक वेळी एकमेकास शह-प्रतिशह देऊन स्वत: वरचढ होण्याचा प्रयत्न करणे हाच यामागील उद्देश. या गटबाजीच्या राजकारणात पालकमंत्री गटाची कमान अनुभवी व मुरब्बी सुरेश पाटील हे सांभाळत असताना दुसरीकडे सहकारमंत्री गटाची सूत्रे स्वत: महापौर शोभा बनशेट्टी व पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी हाताळतात. एकमेकास पाण्यात पाहताना खासगीतच नव्हे तर महापालिकेच्या भर सभागृहात समोरच्या गटाच्या नेतृत्वाचा अजिबात मान न राखता एकेरी भाषेत उल्लेख करून प्रसंगी मानहानीकारक व शिवराळ भाषा वापरण्यापर्यंत घाणेरडी मजल गेली आहे.

गटबाजी कोणत्याही राजकीय पक्षात असतेच. त्यास कोणताही पक्ष अपवाद नसतो. परंतु ही गटबाजी राजकारणापुरती न राहता जेव्हा वैयक्तिक स्तरावर घेतली जाते, तेव्हा त्याची जागा एकमेकास क्रमांक एकचा शत्रू समजण्यापासून ते परस्परांचा द्वेष, मत्सर करण्यापर्यंत मजल जाते. साधारणत: असेच काहीसे चित्र सोलापुरात सत्ताधारी भाजपअंतर्गत गटबाजीतून पाहावयास मिळते.

या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  सोलापूरच्या भेटीवर आले असताना नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावरील विषप्रयोगाची चौकशी अधिककाळ न रेंगाळता विनाविलंब व्हावी, अशी मागणी भाजपअंतर्गत पालकमंत्री गटासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही सीआयडी चौकशीचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच राहिली. परिणामी, नगरसेवक पाटील समर्थकांसह पालकमंत्री गट आणि एकंदरीत सर्वपक्षीयांचा संयम सुटला. या प्रश्नावर गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा नेण्यात आला. या मोच्र्यापासून सहकारमंत्री गट दूरच राहिला होता हे विशेष. मोर्चा काढून आठवडा उलटला तरी सुरेश पाटील विषप्रयोग  प्रकरणाची चौकशी रेंगाळलेलीच दिसते.

नेमकी घटना काय..

अशा प्रकारे पक्षांर्गत गटबाजीने कळस गाठला असतानाच अकरा महिन्यांपूर्वी म्हणजे ५ डिसेंबर २०१७ रोजी तत्कालीन पालिका सभागृहनेते सुरेश पाटील यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यावर सुरुवातीला सोलापुरात व नंतर पुण्यात वैद्यकीय उपचार झाले. परंतु प्रकृती पार ढासळल्याने त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. शरीराची हालचालच थंडावली जाऊन प्रकृती अधिक गंभीर बनली असताना तज्ज्ञ डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून वैद्यकीय उपचार सुरू केले. त्या वेळी झालेल्या रक्ताच्या तपासणीत सुरेश पाटील यांच्या रक्तात हेलियम नावाचा जीवघेणा विषारीद्रव्य आढळून आला.

हा विषप्रयोगाचा प्रकार असल्याचा संशय बळावल्याने या घटनेची माहिती त्याच वेळी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यास कळविण्यात आली होती. त्यानुसार या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली खरी; परंतु नंतर या गंभीर प्रकरणाची चौकशी करायला पोलिसांना वेळच मिळाला नाही. इकडे रुग्णालयात सुरेश पाटील यांची प्रकृती वरचेवर गंभीर बनत होती. दरम्यान, अशा या गंभीर घटनेची चौकशी होण्यासाठी पालकमंत्री विजय देशमुख यांनी स्वत:चे राजकीय वजन वापरले आणि शासनाला या प्रकरणाची सीआयडी चौकशी करणे भाग पडले. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्याचे जाहीर झाले.