Menu

देश
विदर्भात ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांचे मृत्यू अधिक

nobanner

राज्याच्या विविध भागाच्या तुलनेत विदर्भात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण कमी असले तरी मृत्यूची संख्या अधिक आहे. 

महाराष्ट्रात वाढलेले ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण व त्यांच्या मृत्यू संख्येमुळे आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. १ जानेवारी २०१८ ते ४ नोव्हेंबर २०१८ या काळात राज्यात २ हजार ४२२ रुग्ण आढळले. त्यातील ३४३ जणांचा मृत्यू झाला, तर विविध भागात ६ हजार ४२२ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्लूग्रस्तांतील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  विदर्भात या काळात एकूण १६० रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३१ रुग्ण दगावले आहेत. आरोग्य खात्याच्या अहवालानुसार नागपूर विभागात १०९ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यातील १८ रुग्ण दगावले आहेत, तर अकोला विभागात ५१ रुग्णांपैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूर विभागात प्रत्येक शंभरात १६.६१ तर अकोलात सर्वाधिक २५.४९ रुग्ण दगावल्याचे वास्तव पुढे आले आहे.

१९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू म्हणून ओळखला जाणारा स्वाईन फ्लू प्रत्येक ५ ते १० वर्षांनी परत येतो. २००९ मध्ये अनेक देशांमध्ये याची साथ पसरली होती. २०१५ पर्यंत देशात स्वाईन फ्लूची बाधितांची संख्या ५२ हजार ५४० होती. यापैकी ३ हजार ११८ जणांचा मृत्यू झाला.

 ‘‘राज्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढल्याने आरोग्य खात्याने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.  विदर्भात  रुग्ण कमी आहेत, परंतु  मृत्यू अधिक आहे. रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा देण्याबाबत आरोग्य खाते कटिबद्ध आहे.’’