Menu

देश
‘मोरबे’त पाच महिने पुरेल एवढे पाणी

nobanner

महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने नागरिकांचे हाल होत आहेत. शेजारील पनवेललाही मोठी झळ बसत आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात आणखी पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही. असे असले तरी भविष्याचे नियोजन म्हणून पाणीपुरवठय़ाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत अभियंत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्राला ज्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्यात १२ सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा आहे. सलग दोन वर्षे मोरबे धरण भरल्यामुळे यंदाही चांगला पाऊस झाल्यास धरण भरण्याची हॅट्ट्रिक होण्याची शक्यता मोरबे धरण प्रकल्प अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.

यंदाही वेळेत पावसाला सुरुवात झाल्यास व आवश्यक तेवढा पाऊस झाल्यास धरण भरण्याची शक्यता आहे. मोरबे धरण हे ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. धरण पूर्ण भरल्यानंतर धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. २०१७ ला मोरबे धरण परिसरात मागील चार वर्षांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे धरण पूर्ण भरले होते. तर २०१८लाही धरण भरले होते.

गेल्या वर्षीपेक्षा धरणातील पाण्याची पातळी १ मीटरने कमी आहे. त्यामुळे अजून मे पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा तसेच भविष्याचा विचार करता पाणीसाठा शिल्लक असावा याबाबत योग्य नियोजन करण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत असून एमआयडीसी दर गुरुवारी मध्यरात्रीपासून ३० तासांच्या शटडाऊनमुळे काही ठिकाणी पाणीपुरवठय़ाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. परंतु त्या विभागातील अंतर्गत अडचणींमुळे हा प्रकार होत असून त्याबाबतही योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली.

मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा आहे. कोणत्याही प्रकारची पाणीटंचाई जाणवणार नाही. त्यासाठी नियोजन करण्यात येणार असून अभियंत्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठय़ाबाबत आढावा घेणार आहे. शहरातील नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा.