Menu

देश
मोदी लाट ओसरली?

nobanner

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११  एप्रिलला पार पडल्यानंतर, सीएसडीएस आणि सी-व्होटर या निवडणूकविषयक सर्वेक्षण करणाऱ्या दोन प्रमुख संस्था भाजपबद्दल त्यांनी पूर्वी केलेले अंदाज कमी करत असल्याचे दिसत आहे.

याचा अर्थ, यापूर्वीच्या जनमत चाचणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निसटते बहुमत मिळण्याचे किंवा निम्म्यापेक्षा थोडय़ा कमी जागा मिळण्याचे जे भाकीत करण्यात आले होते, ते भाजपला जादाच झुकते माप देणारे असावे अशी शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या आठ मतदारसंघांमध्ये फक्त व्ही. के. सिंह आणि महेश शर्मा हे दोन केंद्रीय मंत्री निवडणूक लढवत असलेल्या गाझियाबाद व गौतम बुद्धनगर या दोन मतदारसंघांमध्येच मतदानाचे प्रमाण वाढले आहे. मुस्लीम मतदारांचे मोठे प्रमाण असलेल्या उर्वरित सहा मतदारसंघांत २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे.’

भाजपला केवळ या दोन मतदारसंघांत फायदा होईल आणि इतर ठिकाणी ते अडचणीत येतील असे सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी पुढील निरीक्षण नोंदवले आहे . असे झाले, तर पहिल्या टप्प्यात भाजपच्या जागा सहाने कमी होतील. याच मतदारसंघांमध्ये २०१४ साली या पक्षाने आठही जागा जिंकल्या होत्या.  कुमार यांनी ही जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यांच्यात त्यांनी भाजपबाबत पूर्वी केलेल्या भाकीतांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक असे बदल झाल्याचे दिसत आहे.

पूर्वीचा लेख सीएसडीएसच्या सर्वेक्षणातील आकडेवारीवर आधारित होता आणि त्यात भाजप चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले होते. १३ एप्रिलच्या दुसऱ्या लेखातील माझे निरीक्षण पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवर आधारित आहे, असे कुमार म्हणाले.

विदर्भात भाजपची कामगिरी अपेक्षेइतकी चांगली होणार नाही, असे मत कुमार यांनी व्यक्त केले. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सर्वेक्षणात, एनडीएला बिहारमधील ४० पैकी २८-३४ जागांवर आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी ३८-४२ जागांवर एकतर्फी विजय मिळेल असे भाकीत वर्तवण्यात आले होते.

महाराष्ट्रालाही सूत्र लागू होणे शक्य

मतदानाच्या आकडेवारीचा उपयोग करून कुमार यांनी त्यांचे उत्तर प्रदेशबाबतचे मूल्यांकन बिहार व महाराष्ट्रालाही लागू केले. या दोन राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या जागांवर मतदानाचे प्रमाण वाढले नाही, हे भाजपपुढे आव्हान असल्याचे निदर्शक आहे. बिहारमध्ये भाजप एकतर्फी विजय मिळवणार असल्याचे भाकीत सर्वेक्षणात करण्यात आले होते. मात्र पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या चार जागांवर चुरशीची लढत झाल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

..तर उत्तर प्रदेशात भाजपला २० ते २५ जागा

११ एप्रिलच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या काही दिवसच आधी जारी केलेल्या सर्वेक्षणात, भाजप उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३२ ते ४० जागा (उत्तर प्रदेशातील जागांपैकी ४० ते ५० टक्के जागा) जिंकू शकतो असा अंदाज सीएसडीएसने वर्तवला होता. मात्र १३ एप्रिलच्या लेखात भाजप पहिल्या टप्प्यातील आठपैकी सहा जागा हरू शकतो, असा अंदाज कुमार यांनी व्यक्त केला. पुढील टप्प्यांमध्येही हाच कल कायम राहिल्यास, भाजपच्या जागा २० ते २५ दरम्यान असू शकतात.