Menu

देश
महाबळेश्वर-पाचगणीत पर्यटकांची झुंबड; वाहतूक ठप्प, प्रशासनाचे नियोजन कोलमडले

nobanner

दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणीला पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून सर्वत्र वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. मोसम आणि सलग सुट्ट्या विचारात घेऊन प्रशासनाने नियोजन केल्यानंतरही मोठ्या संख्येने पर्यटक सहलीसाठी येथे दाखल झाल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणी-वाईला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाट, पाचगणी-महाबळेश्वर रस्ता मोटारींनी फुलून गेला आहे. पाचगणी-महाबळेश्वर दरम्यान सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटक मोटारीतच अडकून पडले आहेत. प्रतापगड ते महाबळेश्वर रस्त्यावरही वाहतूक कोंडीने रस्ते ठप्प झाले आहेत.

मात्र, त्यामुळे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. यावेळी मर्यादित वाहतूक पोलीस हजारो पर्यटकांवर नियंत्रण ठेवत होते. पर्यटकांची वर्दळ आणि मोटारी वाढल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने अडकल्याचे दिसून आले. प्रशासनाने नेटके नियोजन करूनही वाहतूक यंत्रणा कोलमडून गेली होती. यावेळी सातारा पोलीस अधीक्षकांनी महाबळेश्वर-पाचगणी येथील व्यापारी, हॉटेल मालक-चालक, स्थानिक नागरिक यांची बैठक घेऊन पर्यटकांच्या वाढत्या गर्दीबाबत चिंता व्यक्त करत याला शिस्त लावण्याची गरज व्यक्त केली होती.

या परिसरात मर्यादेपेक्षा जास्त वाहने येण्यावर मर्यादा घालण्याची सूचनाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केली होती. दिवाळीच्या सुट्टीत झालेल्या मोठ्या गर्दीचा मानसीक त्रासही पर्यटकांना सहन करावा लागत आहे. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले.