Menu

देश
पुण्याच्या तापमानात झपाटय़ाने बदल

nobanner

रात्रीचे तापमान दोनच दिवसांत आठ अंशांनी घसरले

पुणे शहर आणि परिसरातील तापमानामध्ये पावसाळी स्थितीनंतर झपाटय़ाने बदल होत आहेत. कमाल आणि किमान दोन्ही तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले आहेत. रात्रीच्या किमान तापमानातील बदल लक्षणीय असून, दोनच दिवसांत ते तब्बल आठ अंशांनी घसरले असल्याने रात्रीचा उकाडा काही दिवसांसाठी तरी हलक्या थंडीत परावर्तित झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसाचे कमाल तापमानही कमी झाल्याने उन्हाचा चटका घटला आहे. मात्र, यापुढे आकाश निरभ्र राहणार असल्याने हवामानात पुन्हा बदल होऊन उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेच्या अहवालातून देण्यात आला आहे.

राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर १२ एप्रिलपासून पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. पुण्यात १२ एप्रिलला दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून १३ ते १५ एप्रिलला शहर आणि परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली. या कालावधीत उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होऊन गारपीटही झाली. त्यानंतर शहराच्या तापमानामध्ये झपाटय़ाने बदल होण्यास सुरुवात झाली. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहिला होता. त्यामुळे उन्हाचा चटका तीव्र होता. दुपारी घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. पावसानंतर त्यात एकदमच मोठी घट होऊ लागली. गेल्या दोन दिवसांतच कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांपर्यंत खाली आहे. त्यामुळे तीव्र उष्म्यापासून दिलासा मिळाला आहे.

रात्रीच्या किमान तापमानातही गेल्या दोन दिवसांमध्ये झपाटय़ाने बदल झाले. पावसापूर्वी आणि पावसाळी स्थितीत शहरात किमान तापमानाचा पारा २२ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. त्यामुळे रात्री वातानुकूलित यंत्रणा किंवा पंख्यांशिवाय झोप लागणे शक्य नव्हते. सद्य:स्थितीत किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत खाली गेला आहे. दोनच दिवसांपूर्वी १६ एप्रिलला शहरात २३.२ अंश किमान तापमान होते. त्यात १८ एप्रिलला तब्बल ८ अंशांची घट होऊन रात्रीचे तापमान १५.४ अंशांवर आले. त्यामुळे रात्री काहीशा थंडीचा अनुभव पुणेकरांना येतो आहे.

दिवसा तापमानात वाढ का?

शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने पुणेकरांना सध्या तरी उन्हाचा चटका आणि उकाडय़ापासून दिलासा मिळत असला, तरी पुढील दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. ढगाळ स्थिती आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे सध्या तापमानात घट आहे. मात्र, सध्या शहरातील आकाश निरभ्र राहत आहे. त्याचप्रमाणे हवामानही कोरडे आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे राजस्थान आणि जवळच्या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. परिणामी शहरातील तापमानात वाढ होणार असून, ते पुन्हा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकते.

राज्यातही अल्पसा दिलासा

राज्यातही सध्या तापमानाचा पारा घसरल्याने उन्हाच्या चटक्यापासून काहीशी सुटका झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ४० अंशांपुढे असलेला तापमानाचा पारा सध्या ३५ ते ३८ अंशांच्या आसपास आला आहे. मराठवाडय़ातही सध्या तीच स्थिती आहे. उन्हाचे तीव्र चटके जाणवत असलेल्या विदर्भातही सध्या ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर वगळता इतर ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आत आला आहे. राज्यात रात्रीच्या तापमानातही मोठी घट झाल्याने उकाडा कमी झाला आहे.