Menu

दुनिया
पाकिस्तानने फेटाळला बालाकोट दहशतवादी तळ सुरु झाल्याचा आरोप

nobanner

बालाकोटमधील दहशतवादी तळ सक्रिय झाल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे विधान आधारहीन असून चुकीचे असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. बिपीन रावत यांनी सोमवारी चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना बालकोटमध्ये दहशतवादी तळ सुरु झाला असून ५०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे म्हटले होते.

फेब्रुवारी महिन्यात इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हवाई हल्ल्यात हा दहशतवादी तळ उद्धवस्त केला होता. जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडींपासून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वळवण्याच्या हेतूने दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याच्या बातम्या दिल्या जात आहेत असा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

भारताकडून केली जाणारी विधाने आणि उपायोजना प्रदेशाची स्थिरता आणि शांततेसाठी धोकादायक आहेत. अशी नकारात्मक रणनिती वापरुन भारत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यात यशस्वी होणार नाही असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैझल यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते बिपीन रावत
पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हवाई हल्ला करुन हा तळ उद्धवस्त केला होता असे लष्कर प्रमुख बिपीन रावत सोमवारी म्हणाले. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते.
“५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाचा कसा सामना करायचे ते आम्हाला ठाऊक आहे. कुठल्या जागेवरुन कशी कारवाई करायची ते आमच्या जवानांना ठाऊक आहे. आम्ही पूर्णपणे अलर्ट असून त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची खबरदारी घेऊ” असे बिपीन रावत म्हणाले.
चेन्नईत अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. घुसखोरीचे डाव उधळून लावण्यासाठी आणखी एक स्ट्राइक करण्याची लष्कराची योजना आहे का ? या प्रश्नावर रावत यांनी आम्ही पुन्हा तशीच कारवाई का करु? त्याच्यापुढे का जाऊ नये? आम्ही काय करु शकतो यावर त्यांनाच विचार करुं दे असे उत्तर दिले.