Menu

देश
पंतप्रधान मोदींना अर्थशास्त्रातलं शून्य ज्ञान-राहुल गांधी

nobanner

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं शून्य ज्ञान आहे अशी खोचक टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. “अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था यातलं काहीही पंतप्रधान मोदींना कळत नाही. त्यामुळेच भारताचा जीडीपी अवघा २.५ टक्के वाढला आहे. जेव्हा यूपीएचं सरकार होतं तेव्हा जीडीपी ९ टक्के होता. मात्र मोदी सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेली. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा जगात कलुषित करत आहेत.” असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये झालेल्या रॅली दरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारे निर्णय घेत आहेत ते निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. त्यांच्या निर्णयांमुळेच देशात आर्थिक मंदीचं सावट आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीएसटी म्हणजे काय हे देखील समजत नाही. नोटबंदीसारखा निर्णय जो माणूस घेऊ शकतो त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? तुम्ही ८ वर्षांच्या मुलालाही विचारा, तोही तुम्हाला नोटाबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम किती झाले तेच सांगेल” असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“भारताची जगभरातली प्रतिमा ही बंधुभाव जपणारा देश अशी होती. मात्र ही प्रतिमा मलीन करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भारताच्या राजधानीला म्हणजेच दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलं जातं. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या हक्काबाबत बोलतात तेव्हा त्यांची डोकी फोडली जातात. जेव्हा बेरोजगार रोजगाराबाबत बोलतात तेव्हा त्यांच्यावर गोळी चालवली जाते. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो, हिंमत असेल तर एखाद्या भारतीय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना जरा सामोरे जा. तुम्ही जाऊ शकणार नाही कारण तुम्हाला फक्त खोटी आश्वासनं देता येतात.” असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.